सोलापूर : तीन वर्षांपूर्वी सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर दगड फेकल्याचा राग मनात धरून मारहाण करणाऱ्या पडळकर समर्थक कार्यकर्त्याचे चार तरुणांनी एका गाडीतून अपहरण करून त्याच्या पायावर कोयत्याने वार केल्याचे प्रकरण सोलापुरात घडले. याप्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांना आज न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान याप्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी करावे, अशी मागणी केली आहे. तर रोहित पवार यांनीही सरकार तुमचेच आहे. याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी करावी, असे प्रत्युत्तर दिले आहे.
अक्कलकोट रस्त्यावरील साईनगर भागात राहणाऱ्या एका पडळकर समर्थक कार्यकर्त्याचे चौघांनी मिळून एका मोटारीतून अपहरण गुरुवारी सायंकाळी केले. परंतु, त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून कर्नाटकात झळकली येथून अपहरण केलेल्या तरुणाची अपहरणकर्त्यांकडून सुखरूप सुटका केली. दरम्यान यात अपहरण केलेल्या तरुणाच्या पायावर कोयत्याने वार झाले आहेत. त्यास वैद्यकीय उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घटनेची माहिती कळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी रुग्णाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी आमदार रोहित पवार यांना मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, यातील अपहरणकर्त्यापैकी एकजण आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता आहे. २०२१ साली आपण सोलापुरात आलो असता आपल्या गाडीवर दगड मारणारा हा तोच कार्यकर्ता होता. त्यावेळी आपल्या समर्थक असलेल्या कार्यकर्त्याने त्यास मारहाण केली होती. म्हणून त्याने चिडून त्याचे अपहरण केले आणि त्याचा खून करण्याचा डाव होता. आपण रुग्णालयात संबंधित रुग्णाची भेट घेऊन माहिती घेतली असता, त्याने सांगितले की मला गाडीत बसविल्यानंतर एक ‘व्हिडिओ कॉल’ आला आणि त्यावर आपण माफी मागितली. परंतु तो ‘व्हिडिओ कॉल’ रोहित पवार यांचा होता, असे त्याने सांगितल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.
पडळकर म्हणाले, की कार्यकर्त्यामध्ये कशाला वाद घालता ? त्यापेक्षा मला सांगा, मी बारामतीमध्ये येतो. रोहित पवार यांनी मला वेळ आणि ठिकाण सांगावे मी तेथे येतो, अशा शब्दांत पडळकर यांनी आव्हान दिले. त्यावर आमदार रोहित पवार प्रत्युत्तर देताना म्हणाले, समोरचा कार्यकर्ता कोण आहे, हेच मला माहिती नाही. मला कुठल्याही विषयावर अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर मी कोणालाही घाबरणार नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, सरकार तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही वाटल्यास ‘एसआयटी’ची स्थापना करा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे चौकशी करा, मी दररोज सरकारमधील एका एका मंत्र्याला अडचणीत आणतोय. म्हणूनच मला कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही काही दूधखुळे नाही.
आमचा कार्यकर्ता जर कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्याला पाठीशी आम्ही घालत नाही, असे स्पष्ट करताना आमदार रोहित पवार यांनी, अपहरण करणारा कार्यकर्त्यांस आपण आधीपासून ओळखतो, हे आपण नाकारत नाही.
चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांत अपहरणकर्त्याची सुटका करून संबंधित चौघाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्यामध्ये साडी, ट्रायपॉड, कंडोमची पाकिटे आणि फटाक्यांची माळ असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे साहित्य नेमके कशासाठी बाळगले होते, याचा प्रश्न अनेकांबरोबर पोलिसांनाही पडला आहे. दरम्यान, अटकेतील चार आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.