रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी येण्यास सुरुवात झाली आहे. अशीच चाकरमानी लोकांना घेवून येणाऱ्या एका खाजगी बसला टायर फुटून भीषण आग लागली. या भीषण अपघातातून ४५ प्रवाशांचे प्राण चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले. रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.

मुंबईहून मालवणकडे जाणारी (एमएच ०२ एफजी २१२१) या क्रमांकाच्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली. खासगी आराम बस रविवार पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ आली असता टायर तापून आग लागल्याने ही मोठी दुर्घटना घडली. यात संपूर्ण बस लोकांच्या सामानासह जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून ४५ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. टायर गरम झाल्याने या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी गाढ झोपेत असताना आग लागल्याने चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या बाजूला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. मात्र प्रवाशांचे सामान काढण्यास जमले नाही. सामानासह बस जळून खाक झाली.

खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर वहातूक काही काळासाठी ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातानंतर प्रवाशांना पर्यायी बसची सोय करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे ४५ जीव थोडक्यात बचावले.

या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील आगीत भस्मसात झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.