साताराहून ४४ प्रवासी घेऊन सोलापूरकडे निघालेली एसटी बस प्रवाशाला उतरवण्यासाठी म्हसवडजवळील धुळदेव बसस्थानकासमोर थांबली. त्यावेळी बसने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत काही वेळेत बस जळून खाक झाली आणि केवळ बसचा सांगाडा शिल्लक राहिला. या दुर्घटनेतून ४४ प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात चालक व वाहकाला यश आलं. विशेष म्हणजे बसची डिझेल टाकी देखील पेट घेण्यापासून वाचल्याने मोठा अनर्थ टळला.

बस चालक शंकर रामचंद्र पवार ( रा. आष्टी, ता. कोरेगाव, जि. सातारा ) म्हणाले, “शनिवारी (५ फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास मी व वाहक सुधीर जाधव सातारा येथून सातारा-सोलापूर ( क्र. एमएच ११, बीएल ९३५५) या बसमध्ये ४५ प्रवासी घेऊन सोलापूरकडे निघालो. तेव्हा काही प्रवासी म्हसवडमध्ये उतरले, तर काही प्रवासी नव्याने बसमध्ये आले.”

“संकटकालीन खिडकीतून सर्व प्रवासी आग लागलेल्या बसमधून बाहेर”

“पुढे दुपारी सव्वाएकच्या सुमारास म्हसवडपासून ७ किलोमीटरवर धुळदेव बस स्थानकासमोर एका प्रवाशाला उतरवण्यासाठी बस थांबली. तेव्हा इंजिनमधून धूर येत असल्याचे जाणवले. यावर लगेचच बसच्या पाठीमागील संकटकालीन खिडकीतून सर्व प्रवासी त्यांच्याकडील साहित्यासह उतरवण्यात आले. दुसरीकडे ही खबर म्हसवड नगरपालिका, पोलीस व सातारा एसटी बस आगाराला कळवण्यात आली,” अशी माहिती चालक पवार यांनी दिली.

हेही वाचा : VIDEO: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पेंढा वाहून नेणाऱ्या धावत्या वाहनाला भीषण आग, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी धावली. तोपर्यंत सुदैवाने डिझेल टाकीचा भडका उडाला नाही. बस आगीत जळून बसचा सांगाडा शिल्लक उरला होता. अग्निशमन दलाने आग विझवली. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस सहनिरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहेत.