अहिल्यानगर : जिल्ह्यात काल, रविवारी रात्री गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. अहिल्यानगर शहर व जामखेडमध्ये घडलेल्या या घटनांत पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. नगर शहरातील घटना दोन गटांतील वर्चस्व वादातून, तर जामखेडमधील घटना तात्कालिक वादातून घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातील माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलबुर्मे, उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे उपस्थित होते. नगर शहरातील घटनेत तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांना तीन दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, तर जामखेडमधील घटनेत सहा जणांना अटक करण्यात आली. नगरमधील घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, तर जामखेडमधील घटनेत एक जखमी आहे.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नगर शहरातील तपोवन रस्त्यावरील ढवण वस्ती येथे असलेल्या इंडो आयरिश रुग्णालयासमोर गोळीबाराची घटना घडली. या संदर्भात प्रमोद रामदास घोडके (वय २४, दर्गादायरा, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, प्रमोद घोडके व त्यांच्या मित्रांना ऋषी ढवण याच्याशी संबंध ठेवू नये म्हणून पाच जणांनी मारहाण केली व भीमराज आव्हाड याने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयूर नंदकुमार फणसे (वय ३९), आकाश रोहिदास नसाणे (वय २५) व कुणाल विनायक मराठी (वय ३०, तिघेही रा. ढवण वस्ती, तपोवन रस्ता) यांना अटक केली. दरम्यान, गोळीबार करणारा भीमराज आव्हाड, राहुल विजय सांगळे हे पसार झाले.
नगरमध्ये तिघांना अटक
नगर शहरातील तपोवन रस्त्यावर घडलेल्या घटनेतील आरोपी भीमराज आव्हाड व राहुल सांगळे सराईत आहेत. घटनेनंतर ते फरार झाले आहेत. वर्चस्ववादातून गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, भीमराज आव्हाड हा पांगरमल दारूबळी प्रकरणातील आरोपी असून, तो सध्या जामिनावर सुटला आहे. त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
जामखेडमध्ये सहा जण अटकेत
रात्री दहाच्या सुमारास जामखेडमधील विंचरणा नदीच्या पुलावर आदित्य पोकळे आणि त्याच्या मित्राचा रस्त्यावर लघुशंका करण्याच्या कारणावरून अनोळखी व्यक्तीशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि अनोळखी व्यक्तीने आदित्य व मित्राला मारहाण करत तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी आदित्यचा मित्र कुणाल बंडू पवार याच्या पायाला लागली. त्याला नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य पोकळेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रभू रायभान भालेकर (निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णू मुळे (खेरडा, पैठण), शरद अंकुशराव शिंदे (पुसेगाव, पैठण), गणेश गोविंद आरगडे (खंडाळा, पैठण), रावबहादूर श्रीधर हरकळ (बीड बाह्यवळण, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दोन रिकाम्या पुंगळ्या, दोन वाहने जप्त केली आहेत.