सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय, आंतरधर्मीय, विधवा- विधुर विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करणाऱ्या वधू-वरांनी आणि पालकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे.

सध्या राज्यात आणि देशभरात जाती-जाती आणि धर्मा-धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी असे जोडीदार शोधणे अत्यंत अवघड झाले आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

अंनिसच्या या केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना, याची पडताळणी केली जाते. सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह करावा असा सल्ला दिला जातो. नाव नोंदणीची सेवा ही विनामूल्य दिली जाते.

सध्या समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधू-वर सूचक केंद्र आहेत, परंतु जात-धर्म न मानणाऱ्या पालकांना किंवा वधू-वरांना जर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करायचा असेल तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही. त्यामुळे ही सोय महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे. याचे काम ‘ऑनलाइन’ पद्धतीने चालवले जाणार आहे. अधिक माहितीसाठी या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे (संपर्क ९९२२३५५४३५) आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे (९५२७७२१४७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावते. असे विवाह करणाऱ्या मुला-मुलींसाठी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र (सेफ हाऊस) साताऱ्यातील रहिमतपूर येथे चालू केले आहे. याअंतर्गतच हा पुढचा उपक्रम सुरू करत आहोत. – डॉ. हमीद दाभोलकर.