विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची भूमिका ही गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सातत्याने आम्ही मांडतोय. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे, भाजपाने नेमलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना परत पाठवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी व्यक्ती राजभवनात कशी काय बसू शकते? मुळात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांचा साधा निषेध करू नये आणि आज त्यांचे लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले आहेत. ”

हेही वाचा – “…पण मुंबई आधी महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका” मुख्यमंत्री योगींच्या दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

याचबरोबर “छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक, धर्मवीर, महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. पण त्यांचे वडील या देशाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान तुम्ही विसरता कसे?” असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, “आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात न्याय होईल. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्या दोघांचेही गट आणि पक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल रस्त्यावर उतरावं, जसं ते आज उतरलेले आहेत आम्ही त्यांचं स्वागत करू.” असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अगोदर शिवसेनेने आज सामनामधील अग्रलेखामधूनही शिंदे-फडणवीसांवर टीका केल्याचे दिसून आले. “छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.