भारताच्या पश्चिम किनाऱ्यासाठी प्रथमच, महाराष्ट्रातील वेळास येथे ‘ऑलिव्ह रिडले’ मादी कासवाला यशस्वीरित्या उपग्रह टॅग करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवाचे हे पहिले उपग्रह टॅगिंग आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांची तुरळक घरटी आहेत. आत्तापर्यंत ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनार्‍यावर टॅग केले गेले आहे. ‘महाराष्ट्राच्या किनार्‍यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरित हालचालींचा मागोवा घेणे’ हा संशोधन प्रकल्प महाराष्ट्र वनविभाग, कांदळवन कक्षाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेकडे कार्यान्वित करण्यात आला आहे. या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांची हालचाल समजून घेण्यास मदत होईल. या प्रकल्पांतर्गत एकूण पाच ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवांचे उपग्रह टॅग केले जाणार आहेत, त्यापैकी पहिले उपग्रह टॅग मंडणगड तालुक्यातील वेळासमध्ये करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनात ते लावण्यात आले आणि मंगळवारी सकाळी या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

यावेळी कांदळवन कक्षाचे रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, कांदळवन कक्षाचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, धनश्री बगाडे, संशोधन समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते.

या कासवाला ‘प्रथमा’ असे नाव देण्यात आले आहे, कारण ते महाराष्ट्रात (आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यासाठी) टॅग केलेले पहिले उपग्रह आहे. तसेच ते महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनाच्या एका नवीन युगाची सुरुवात देखील दर्शवते. महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्था आणखी चार ‘ऑलिव्ह रिडले’ टॅग करण्याची योजना आखत आहेत. यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील विविध समुद्रकिनाऱ्यांवरील कासवांचा समावेश आहे. उपग्रह टॅग हे त्यांच्या स्थानाचे संकेत उपग्रहाला पाठवतील. त्यानंतर संशोधकांना त्यांच्या स्थानांची माहिती मिळेल. या प्रकल्पाचा खर्च सुमारे नऊ लाख ८७ हजार रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनार्‍यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यास मदत होईल. या कासवाला ‘प्रथमा’ असे नाव देण्यात आले आहे, कारण ते महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनाच्या नवीन युगाची सुरुवात करते,” अशी माहिती कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेद्र तिवारी यांनी दिली आहे.