निखिल मेस्त्री, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर

बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रवेश पूर्व अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील इंटरनेट व ऑनलाईन सुविधेअभावी या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरणे अनिवार्य होते. याच बरोबर ज्या महाविद्यालयात अर्ज करायचा आहे त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने भरणे अपेक्षित होते.या प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतही ठेवण्यात आली होती. विद्यापीठाने ही मुदत बुधवारपर्यंत दिली असल्याने ती मुदत बुधवारी संपुष्टात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करोना काळात सार्वजनिक, खाजगी वाहतूक सुविधा तसेच इंटरनेटसह ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहणार असल्याने ते या प्रक्रियेच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ ने यासंदर्भात मंगळवारी बातमी प्रसिद्ध केली होती. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी तथा आमदार सुनील भुसारा यांनीही विद्यार्थ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेत या संदर्भात मंत्रालयात जाऊन तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही मुदतवाढ करण्याची मागणी मागितली जाईल, असे म्हटले होते.

गुरुवारी सकाळी आमदार सुनील भुसारा यांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन प्रथम वर्ष प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील अशी भीती व्यक्त करत प्रवेश पूर्व अर्जासाठीची ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली. आमदार सुनिल भुसारा यांच्या या मागणीला सामंत यांनी तात्काळ होकार देत ही मागणी मान्य केली, अशी माहिती भुसारा यांनी दिली. त्यानंतर सामंत यांनी ही मुदत वाढवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना कुलगुरूंना केल्या.जोपर्यंत शेवटचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाचे हे संकेतस्थळ प्रवेशासाठी सुरूच राहील असेही तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत यांनी या सूचना केल्यामुळे या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता एकही विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहणार नाही व अभ्यासक्रमालाही मुकणार नाही असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

“लोकसेवक म्हणून जिल्ह्याच्या समस्या शासनाकडे मांडून त्या सोडविणे हे माझे प्रथम कर्तव्य असून मी त्यासाठी कटिबद्ध आहे.विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा हा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे.त्यातच माझा आनंद आहे.आता एकही विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील भुसारा यांनी दिली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First year degree admission process minister uday samant mla sunil bhusara vjb
First published on: 07-08-2020 at 18:24 IST