सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील मच्छीमार हवालदील; पर्यायी बाजारपेठेचा शोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : परराज्यातील मासळीला गोवा सरकारने आरोग्याच्या कारणावरून बंदी घातल्यामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

सोमवारपासून (१२ नोव्हेंबर ) किमान सहा महिन्यांसाठी ही बंदी राहणार असल्याचे गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी जाहीर केले. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ांमधील मत्स्य व्यवसायाला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.

दक्षिण गोव्यात मासळी तपासणीची प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ परराज्यातील मासळीला प्रवेश बंदी असेल, असे राणे यांनी म्हटले आहे.

मडगाव येथे गोव्याचा घाऊक मासळी बाजार आहे. तेथे विक्रेत्यांची संघटना आहे. त्या संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी या विषयावर गोवा सरकारला आव्हान देणे सुरू केल्याने सरकारने अखेर सहा महिन्यांच्या बंदीचा बडगा उगारला आहे. मात्र, त्याचा खरा फटका सिंधुदुर्गातील मासे विक्रेत्यांना बसणार आहे. गोव्यातील मासे विक्रेते सिंधुदुर्गात मासे आणण्यासाठी गाडय़ा पाठवतात.  तसेच सिंधुदुर्गातील मासे विक्रेते आपल्या वाहनांनीही मासे पाठवतात. मात्र आता सहा महिने हा व्यवहार होणार नाही. या सगळ्याचा परिणाम स्थानिक बंदरातील मासळीच्या दरांवर होणार आहे. दरम्यान, गोव्यातील मच्छीमार रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या हद्दीत येऊन मासेमारी करतात, अशी येथील मच्छीमारांची नेहमी तक्रार असते. या पाश्र्वभूमीवर परराज्यातील नौकांवर गस्तीनौकेद्वारे लक्ष ठेवण्यात आले आहे, असे प्रभारी साहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी नमूद केले.

मासळी पडून..

रत्नागिरीमधून नेल्या जाणाऱ्या पापलेट आणि बांगडय़ाची गोव्यातून परदेशात निर्यात होते, तर लेपा, ढोमा, वाशी, कुर्ली हे गोव्याच्या स्थानिक बाजारपेठेत पाठवले जातात. गोव्यात दर दिवशी सुमारे वीस ते पंचवीस टन मासळी जाते. बंदीमुळे ही नाशवंत मासळी पाठवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यातील समुद्रात प्रचंड मासळी मिळाली होती. गोवा बंदीमुळे मोठे नुकसान झाल्याचे, तसेच  मासळीचे दरही घसरल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.

आर्थिक नुकसान..

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून विविध प्रकारची दररोज सुमारे पन्नास टन मासळी गोव्यात जात असून माशाच्या जातीनुसार त्याची किंमत सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये होते. बंदीमुळे या मासळीसाठी पर्यायी बाजारपेठ शोधण्याचे आव्हान स्थानिक मच्छीमारांपुढे उभे राहिले आहे.  रत्नागिरी तालुक्यासह हण्र, नाटे या बंदरांमधून दर दिवशी एकूण उत्पादनाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त मासळी  गोव्याकडे रवाना होते; मात्र ही वाहतूक सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर थांबवली जाऊ लागल्यामुळे दर आठवडय़ाला सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबणार आहे.

गोव्यात मासळी पाठवण्यासाठी आवश्यक सुविधा नीलक्रांती योजनेतून मच्छीमारांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मासे व्यावसायिकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होणार आहे.

– पुष्कर भुते, मच्छीमार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish business in konkan hits due to ban on fishing in goa
First published on: 13-11-2018 at 02:29 IST