सांगलीतील स्टेशन रोड परिसरात असणा-या भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री घडला. इमारत मालक काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हारुण शिकलगार असल्याने निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर या प्रकरणानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
स्टेशन रोडवर हारुण शिकलगार यांच्या वडिलांच्या नावे इमारत असून ती जुनी झाली आहे. धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली आहे. या इमारतीत काही दुकान गाळे असून दुसऱ्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे. रविवारी रात्री या इमारतीवरील छत उतरविण्याचा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस येताच भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत कोणतीही नोटीस न देता इमारत उतरविण्यास विरोध दर्शविला. भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील, श्रीमती नीता केळकर, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आदींनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तोंडी तक्रार दिली.
तथापि, इमारतीचे मालक नगरसेवक हारुण शिकलगार यांनी या प्रकरणी संबंधितांना कल्पना दिलेली असल्याचे सांगत इमारत धोकादायक असल्याने अनर्थ टाळण्यासाठी काही भाग उतरावा लागल्याचे सांगितले.