सोलापूर : सोलापूरच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा मुहूर्त अखेर उशिरा का होईना, गोव्याच्या माध्यमातून निश्चित झाला आहे. ही विमानसेवा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. गोव्यानंतर मुंबईसाठी विमानसेवा प्राधान्याने सुरू करण्याची मागणी होत असून, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे.

गोवा-सोलापूर-गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ विमान वाहतूक कंपनीने जबाबदारी घेतली आहे. या विमानसेवेसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रवास तिकीट नोंदणीही सुरू झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आठवड्यात सोमवार आणि शुक्रवारी गोवा येथून सकाळी ७.२० वाजता सोलापूरसाठी विमानाचे उड्डाण होईल आणि एक तास १० मिनिटांत म्हणजे सकाळी ८.३० वाजता सोलापूर विमानतळावर विमान उतरेल. त्यानंतर सकाळी ८.५० वाजता सोलापूरहून गोव्यासाठी विमानाचे उड्डाण होऊन सकाळी १०.१५ वाजता हे विमान गोवा विमानतळावर पोहोचणार आहे. शनिवार आणि रविवारी सायंकाळी ४.०५ वाजता गोव्यातून सोलापूरसाठी विमान उड्डाण होईल. हे विमान सायंकाळी ५.१० वाजता सोलापुरात उतरेल. त्यानंतर सायंकाळी ५.३५ वाजता सोलापूरहून विमानाचे उड्डाण होऊन सायंकाळी ६.५० वाजता गोव्यात पोहोचेल. या ७२ आसनी विमान प्रवासासाठी कमीत कमी ३४९१ रुपये आणि जास्तीत जास्त ५६०० रुपये भाडे राहणार आहे.

सोलापूर विमानसेवेची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यासाठी आंदोलनही छेडण्यात आले होते. २०१६ साली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उडान योजनेत सोलापूरचाही समावेश केला होता. परंतु त्यास कधीही मुहूर्त लागला नव्हता. दरम्यान, विमानसेवेला विमानतळालगतच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उंच चिमणीचा असलेला अडथळाही दोन वर्षांपूर्वी दूर करण्यात आला होता. परंतु इतर आवश्यक सुधारणा करूनही पुढे विमानसेवा सुरू होण्यास विलंब झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोलापूर विमानतळाचे सुशोभीकरण झाले असता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. मात्र तरीही विमानसेवा रखडली होती.

दरम्यान, गेल्या महिन्यात गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचे ठरले होते. त्यासाठी २६ मे रोजीचा मुहूर्त ठरला होता. प्रत्यक्षात विमानसेवा मृगजळासारखे ठरते की काय, अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंच या सामाजिक संघटनेसह काँग्रेस पक्षाने लक्षवेधी आंदोलन केले होते. विमानसेवेचा प्रश्न सोलापूरकरांठी जिव्हाळ्याचा ठरला असताना आगामी सोलापूर महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या विमानसेवेचा मुद्दा सत्ताधारी भाजपसह महायुतीसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता स्थानिक राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर अखेर पुन्हा राजकीय आणि प्रशासकीय हालचाली वाढल्या आणि प्रत्यक्ष गोव्यासाठी का होईना, सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त लागला आहे.

सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून मुंबईत बैठका घेऊन पाठपुरावा सुरू होता. तूर्त शासनस्तरावर गोव्यासाठी विमानसेवा सुरू करून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईसह हैदराबाद, तिरुपतीसाठी, तसेच इतर महानगरांना जोडण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न होत आहेत.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूरच्या औद्योगिक, व्यापार, व्यवसायवाढीसाठी मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची जुनी मागणी आहे. परंतु मुंबईत विमानतळावर ‘स्लॉट’ उपलब्ध होत नसल्याने अडचण आहे. या विमानसेवेला आगामी काळात प्रतिसाद न मिळाल्यास त्याचा दोष पुन्हा सोलापूरकरांनाच देण्याची शक्यता वाटते. – श्रीनिवास वैद्य, सनदी लेखापाल, संस्थापक सदस्य, सोलापूर विकास मंच