गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीला झोडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असल्याने कृष्णा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. पूरपरिस्थितीचा धोका ओळखून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तसचे एनडीआरएफच्या दोन तुकड्याही सांगलीत दाखल झाल्या असून, सांगलीवरील पुराचे संकट गडद होत चालले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे राधानगरी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, पंचगंगा नदीपाठोपाठ कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. पूरपरिस्थती ओढवण्याची शक्यता असल्याने पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. “पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर राज्य सरकारचे लक्ष आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे”, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

सांगलीत कृष्णा नदीने ३२ फूटांपेक्षा जास्त पाणी पातळी गाठली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले होते. दोन तुकड्या सांगलीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून होणारा विसर्ग वाढविण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारकडे केली होती. त्यानंतर अलमट्टी धरणातून एक लाख ७० हजार क्युसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) विसर्ग दोन लाख २० हजार क्युसेक इतका वाढवण्यात आला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.