पारनेर शहरास सोमवारी जोरदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच मनकर्णिका नदी तसेच ओढे व नाल्यांना पूर आल्याने कान्हूरपठार व जामगाव या रस्त्यांवरील गावांचा दोन तास संपर्क तुटला होता. सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या या पावसाने शहर व परिसरातील सर्व तलाव, बंधारे, नाले खचाखच भरून वाहू लागले असून, शहरास पाणीपुरवठा करणा-या हंगा तलावात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
शहराबरोबरच तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून दुष्काळ दूर होऊ लागल्याची चाहूल तालुक्यातील जनतेला लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहर व परिसरात पावसाची जोरदार हजेरी लागत असून सोमवारी धुवाधार पावसाने कळसच केला. गेले तीन दिवस सलग पडलेल्या पावसाने परिसरातील बहुतेक तलाव, ओढेनाले भरले. रविवारी झालेल्या पावसाने अलीकडेच राबविण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्नचे बंधारे भरून वाहू लागले होते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच मनकर्णिका नदी तसेच ओढयानाल्यांना पूर आला.
अनेक वर्षांनंतर मोठा पाऊस होऊन नद्यानाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेकांनी पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला. पूर पाहण्यासाठीही शेकडो लोक मनकर्णिका नदीच्या तीरावर ठाण मांडून होते. संततधार पावसामुळे अनेक वर्षांनंतर पारनेरकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, टाकळीढोकेश्वर, कान्हूरपठार, भाळवणी, जामगांव, सुपे, वाडेगव्हाण, निघोज, वडझिरे, अळकुटी, परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली.