नांदेडमध्ये फुलांची आवक प्रामुख्याने तेलंगणा व आंध्रप्रदेशातून होते. गुलाबासहब काकडा, मोगरा व शेवंती या जातीच्या फुलांना मागणी असते. परंतु मागील आठ दिवसांत महाराष्ट्रासह तेलंगणा व आंध्रात सुद्धा पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी फुलांची आवक होऊ शकली नाही. त्यामुळे दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
सध्या महाराष्ट्रात विविध सणांची मांदियाळी सुरु आहे. गणेशोत्सवात गौरी गणपतीचे आगमन होते. रविवारी (दि. ३१) महालक्ष्मीचे आवाहन झाले. आज सोमवारी पूजन आहे. त्यासाठी फुले व हारांना मोठी मागणी असते. लाखो रुपयांची उलाढाल या एकाच दिवशी होते. परंतु यंदा परिस्थिती प्रतिकूल आहे. नांदेड जिल्ह्यात सतत जोरदार पाऊस व वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे स्थानिक पातळीवर निर्माण होणारा भाजीपाला व फुलांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक माल बाजारात उपलब्ध नाही.
महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. तेथील पोचमपाड व निजामसागर या दोन मोठ्या धरणातून अचानक पाणी सोडले गेल्यामुळे काठावरील शेतात पाणी शिरले आहे. त्यातही अनेक रेल्वेमार्गाखालून किंवा पुलावरुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या. महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांदरम्यान मालवाहतुकीचे मुख्य साधन रेल्वे हेच आहे. रेल्वेच बंद असल्यामुळे ऐन मागणीच्या काळात फुलांची आवक होऊ शकली नाही. त्यामुळे फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.
झेंडू स्थानिक पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. तरी सुद्धा रविवारी त्याचे दर ८० ते १५० रुपये प्रतिकिलो होते. गुलाब ४०० ते ६०० रुपये, शेवंदी ५०० ते ६०० रुपये किलो या प्रमाणे विकली गेली. काकडा हजार रुपयांवर पोहोचला आहे. मोगरा दुर्मिळ झाला असून तयार वेण्यांचे दर ५० रुपयांपर्यंत गेले आहेत. जर्बेरा ३५० ते ४५०, लिली ९०० रुपयांपर्यंत असे प्रचंड दर आहेत. फुलांप्रमाणेच फळांचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सफरचंद, डाळिंब ही नेहमी वापरली जाणारी फळे २०० रुपये किलोपेक्षा कमी नाहीत.