घोटाळा झाल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यातील काही भागातील विशेषत मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचे चटके शेतकरी व सर्वसामान्य जनता सोसत असताना  सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चारा छावण्यांमध्ये बोगस जनावरे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चारा छावण्यांमधील या घोटाळ्याची चौकशी  करावी, अशी अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माणसांना व जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. या सरकारने दुष्काळ जाहीर करुनही चारा टंचाई असताना चारा छावण्या सुरु करण्यात घोळ घातला. आता जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण दिले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले आहे. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तत्काळ कारवाई करावी,  असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मराठवाडय़ात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांंनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठय़ा प्रमाणावर चारा छावण्या सुरु केल्या आहेत. मात्र त्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.  बीड जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी प्रमाणात जनावरे आढळून आली. चारा छावण्यांवर अचानक केलेल्या या कारवाईत १६ हजार जनावरे कमी आढळून आली. जनावरांची वाढीव संख्या दाखवून दिवसाला ७ लाख ते १४ लाख रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचे  दिसून आले. अशाच पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांंनी अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या बोगस दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतले आहे. बीड जिल्ह्यासह सर्व चारा छावण्यांचे लेखापरीक्षण  करुन सरकारी अनुदान लाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी, मागणी त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fodder camp given to ruling party workers says ashok chavan zws
First published on: 22-06-2019 at 04:19 IST