दाट आभाळ, कुंद हवा, मध्येच पावसाचा हलका शिडकावा आणि पुन्हा ऊन. ऐन हिवाळय़ात गुरुवारी नगरकरांनी श्रावणाची अनुभूती घेतली. हवामानातील या बदलाने नागरिक वैतागले असून शेती पिकांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होते.
शहरासह जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांपासून आभाळ येत आहे. मागच्या पंधरा दिवसांत जिल्हय़ात थंडीची तीव्रता चांगलीच वाढली होती. यातील काही दिवस राज्यातील नीचांकी तापमान नगरला नोंदवले गेले. काही दिवस पारा आठ अंशाच्याही खाली घसरला होता. मात्र मागच्या दोन दिवसांत आभाळ येऊ लागल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे.
शहर व परिसरात मंगळवारपासून ढगाळ हवामान आहे. मंगळवारी रात्री हलके थेंबही आले. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणच होते. नववर्षदिनी गुरुवारी सकाळपासूनच शहर व परिसरात पावसाळी वातावरण होते. मात्र त्याच्या जोडीला थंड वारे वाहात होते, त्यामुळे गारठा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास काही वेळ पावसाचा हलका शिडकावाही झाला. त्या वेळी गच्च पावसाळी वातावरण तयार झाले होते, मात्र काही वेळातच पाऊस गायब होऊन पुन्हा ऊन पडले. वातावरणातील या ‘श्रावणी’ बदलाने नगरकर वैतागले आहेत. साथीच्या आजारांना निमंत्रण देणारेच हे हवामान असून अनेकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे.
या हवामानाचा जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील शेतीलाही फटका बसण्याची भीती व्यक्त होते. विशेषत: द्राक्ष, डाळिंब अशा फळबागांसह गहूकाढणीला आलेली ज्वारी या पिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या थंडीमुळे गव्हासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र ढगाळ हवामान आणि थंडी कमी झाल्याने गव्हाला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसिटीCity
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fog in the city
First published on: 03-01-2015 at 03:00 IST