हापूस आंब्याच्या लोभापोटी अन्न व औषध प्रशासन खात्यातील अधिकारी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. उमेश रामराव कावळे (वय २७) असे त्याचे नाव. तो खात्यात अन्नसुरक्षा अधिकारी (वर्ग २) आहे. त्याच्याच कार्यालयात दुपारी दीडच्या सुमारास १० हजार रुपयांची लाच घेताना विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
सावेडी भागात अतुल अष्टपुत्रे यांनी कृषी खात्याच्या सहकार्याने नैसर्गिकरीत्या फळे पिकवण्याचा प्रकल्प (रॅपनिंग चेंबर) उभारला आहे. शेतक-यांना आपला माल थेट बाजारपेठेत उपलब्ध करणारा हा प्रकल्प आहे. सध्या आंब्यांचा हंगाम सुरू असल्याने प्रकल्पात आंबे पिकवले जातात. गेल्या ८ मेपासून अन्न सुरक्षा अधिकारी कावळे अष्टपुत्रे यांना आंब्याचे नमुने तपासणीसाठी पाठवू नये यासाठी पैशाची मागणी करत होता. सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. प्रशासन कार्यालयातील एकाने अष्टपुत्रे यांच्याकडून फुकट हापूस आंबेही नेले, असे खात्रीलायक समजले.
अखेर १० हजार रुपयांवर तडजोड झाली. अष्टपुत्रे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार कावळे याला लाच घेताना पकडण्यात आले. अन्न व औषध प्रशासनचे कार्यालय सावेडीतील ऑक्झिलिअम शाळेच्या मागे आहे. कावळेविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे हा चारच वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाला होता. पथकाने त्याच्या घराची झडती घेतली, मात्र आक्षेपार्ह काही आढळले नाही. पथकाचे उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी लाच घेताना पकडण्यात आलेला नगरचा नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे याची आज सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
दहा दिवसांत ६ लाचखोर सापळ्यात
लाचलुचपत विरोधी पथकाने गेल्या दहा दिवसांत जिल्ह्य़ातील ६ अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यात तिघे पोलिस, दोन महसूलचे व एक अन्न व औषध प्रशासन खात्यातील आहे. एकापाठोपाठ कारवाई होऊनही सरकारी कर्मचा-यांची मानसिकता बदलत नसल्याचेच हे लक्षण आहे. मात्र या कारवायांनी जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food security officer caught taking bribe
First published on: 21-05-2014 at 03:43 IST