कराड: पाश्चात्त्य संस्कृतीला भुलून दुःख, विकलांगता, मनोरुग्ण व विविध आजारांना लोकांनी कवटाळले. संस्कृती सोडल्यामुळे देवत्व गेले. ते परत मिळवण्यासाठी घरोघरी गोमातेचे पालन, संगोपन होणे गरजेचे असल्याचे मत शेतीमित्र, गो तज्ज्ञ अरुण पाटील यांनी व्यक्त केले.

श्री गोरक्षण संस्था न्यासातर्फे शिवजयंतीनिमित्त ‘भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू- देशी गाय, मानवी आरोग्य व संपूर्ण पर्यावरण रक्षण’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, न्यासाध्यक्ष सुनील पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, दहा हजार वर्षांपूर्वी अठरा महर्षींनी आपल्याला पहिली धार्मिक, सांस्कृतिक आचारसंहिता दिली. गाय उभी, तिथे तीर्थक्षेत्र उभारते असे सांगितले. परंतु, ऋषिमुनींची संकल्पना आपण विसरलो आहोत.

जागतिक बाजारपेठेत ४५ टक्के कृषी उत्पादन एकट्या भारताचे होते. मात्र, आज आपल्या शेतीची अवस्था बिकट झाली. हरियाणातील गहू, तांदळातून विषारी कण आपल्या पोटात जातात, हे संशोधनातून समोर आले. पिकांवरील विषारी औषधांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले. नदी अन् गाईला माता मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललो आहे. गंगेच्या पाण्यातील जैवविविधता जगातील कोणत्याही नदीच्या पाण्यात आढळत नाही. मात्र, गंगा नदी अपवित्र करण्याचे पाप आपण केले. मनःशांती, शीघ्र विचारशक्ती ठेवण्यासाठी पाणी शुद्ध ठेवायला हवे. तिथी, वार, नक्षत्र, चरण यांनुसार झाडात वेगवेगळी प्रथिने तयार होतात. म्हणून वडाला प्रदक्षिणा घालण्याची संस्कृती असल्याचे पाटील म्हणाले.

‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ या तुकाराम महाराजांच्या चरणाचा आधार घेत ते म्हणाले, गाईंमुळे २३ टक्के प्राणवायू मिळतो. तिच्या शेण्यात ३० टक्के, तर वाळलेल्या शेणात ४५ टक्के प्राणवायू असतो. गाईच्या शेणाचा सडा अंगणात मारल्याने अल्ट्रानील किरणे सहा फुटांवरून परावर्तीत होतात. गोमूत्राच्या गंध लहरींमुळे बुद्धिमत्ता वाढते. गोमूत्र कीडनाशक असून, त्यातून १६ अन्नद्रव्य पिकाला मिळतात. दररोज ४५ मिलीमीटर गोमूत्र प्राशन करावे. कर्करोगापासून वाचण्यासाठी गोमूत्राशिवाय पर्याय नसल्याचे जगमान्य आहे. गोमूत्र कोलेस्ट्रॉल जाळून टाकते. गाईचे दूध, दही, ताक, तूप अत्यंत औषधी आहे. गाय घराघरात जावी, शेतीचे, घराचे आरोग्य निरोगी राहणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, हिंदूंवर, गाईंवर हल्ले होताना लोक षंडासारखे गप्प आहेत. अनेक जण दानधर्म करतात. परंतु, गोपालन संस्थेला मदत करताना कुचराई करतात. प्रास्ताविक सुनील पावसकर यांनी केले.