राज्य सरकार लवकरच पडणार असल्याचं विधान वारंवार भाजपाकडून केलं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. कार्यकर्ते, आमदरांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय, असं त्यांनी म्हटलं आहे. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधीपक्षांना सरकार पडणार अस म्हणावंचं लागतं. कार्यकर्ते बरोबर रहावेत, आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी त्यांना सारखं गाजर दाखवायंच काम करावं लागतं. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे तिघं या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यत या सरकारला काहीही होणार नाही. त्यांचे १०५ लोक निवडून आलेले असतानाही सरकार स्थापण्याची संधी मिळाली नाही हे त्यांचं खरं दुखण आहे. त्यामुळे सारखं ते काही ना काही काड्या पेटवायचं काम करत आहेत.”

आणखी वाचा- “मराठा आरक्षणामुळं रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया होणार सुरु; दोन दिवसांत येणार अध्यादेश”

सरनाईकांवरील कारवाईबाबत भाष्य टाळलं

यावेळी अजित पवार यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत भाष्य करणे टाळलं. शरद पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशावेळी स्पष्टपणे याबाबत पक्षाची भूमिका मांडली. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही त्यावर पुन्हा टिपण्णी करणे योग्य नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- मंदिराच्या विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही – शरद पवार

“आम्ही स्वप्न पाहत नाही, थेट कृती करतो”

स्वप्न पहाण्याचं काम आम्ही करतच नाही आम्ही थेट कृती करण्याचं काम करतो. चंद्रकांत पाटलांना कधी कळलं की आम्हाला स्वप्न पडलीत म्हणून. आज जगभरात करोनामुळं बिकट परिस्थिती असताना आम्ही सर्वजण राज्यातील महत्वाच्या गोष्टींवर काम करीत आहोत. कुठ्ल्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी सरकारने दहा हजार कोटींची मदत केली. एसी कर्मचाऱ्यांसाठी १ हजार कोटींची पॅकेज देऊ केलं, अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल; रावसाहेब दानवेंचा दावा

यशवंतरावांमुळे राज्याच्या विकासाचे दूरगामी परिणाम

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे यशवंतराव चव्हाण आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाच्या वाटचालीत दुरगामी चांगले परिणाम पहायला मिळत आहेत. वेणूताईं ज्या मजबुतीने त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे कराडकरांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळेच ते राज्यात आणि केंद्रात अनेक महत्वाची पदे भुषवू शकले, अशा शब्दांत त्यांनी यशवंतरावांचा स्मृतीदिनी गौरव केला.