सोलापूर :’ उडान २०२५ ‘ अंतर्गत प्रशासकीय कामात गुणवत्ता वाढीसाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. यात सार्वजनिक वितरण प्रणालीसह शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या पाच विभागांचा प्राथमिक स्तरावर समावेश करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून तक्रारी असतील तर त्यांच्या नोंदी डॅशबोर्डवर घेतल्या जात आहेत. त्या नोंदीच्या आधारे तक्रारींचे निवारण संबंधित तालुकाप्रमुख व विभाग प्रमुख आठ दिवसांत करतील. यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना आणि प्रशासकीय कामकाजाचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे.
या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा शुभारंभासह त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आदींसह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती. महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविक भाषणात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सोलापूर हा देशातील पहिला जिल्हा असल्याचा दावा केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये कॉलिंग सेंटरकडून दररोज १५ ते २० हजार नागरिकांना मोबाईलवर थेठ संपर्क साधले जात आहे. यातील सहा ते सात हजार कॉलवर नागरिक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन संबंधित विभागाच्या कामकाजासंबंधी आपले मत मांडत आहेत. त्यानुसार डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहेत तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक आहे, याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत आहे. त्याचा उपयोग पुढील उपाययोजनांसाठी विशेषतः शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रशासकीय कामकाज गतिमान व सुलभ पद्धतीने होण्यासाठी केला जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ३२५० शासनमान्य रास्त भाव धान्य दुकाने आहेत. त्या अंतर्गत १६ लाख ५० हजार नागरिक दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू घेतात. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर परिणामकारक ठरणार आहे. शिक्षण विभागाअंतर्गत अडीच ते तीन हजार शाळा आणि दहा ते बारा हजार शिक्षक तसेच लाखो विद्यार्थी आहेत. तसेच आरोग्य विभागाकडे लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या विभागांच्या योजना, कार्यपद्धती आणि नागरिकांना या योजनांचा लाभ मिळतो की नाही, हे अचूकपणे पाहून पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता कॉलिंग सेंटरची जबाबदारी मार्केटिक्स कंपनी सांभाळत आहे. या कंपनीचे संचालक मोहित कोकीळ यांनी सर्व संबंधित विभागांच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात या प्रणालीतून कशा पद्धतीने कॉल केले जातात ? किती लाभार्थ्यांचे संपर्क क्रमांक आहेत ? लाभार्थ्यांना कॉल केल्यानंतर ‘ एआय ‘ मार्फत कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला जातो ? त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे नाव गुपित ठेवून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डॅशबोर्ड वर मराठी व इंग्रजी मध्ये कशा पद्धतीने नोंदी घेतले जातात, या कार्यपद्धतीची माहिती दिली. प्रत्येक तालुका व जिल्हा कार्यालयास लॉगिन आयडी उपलब्ध करून दिला जातो.तो उघडल्यावर संबंधित विभागाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी डॅशबोर्डवर दिसतात. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करणे अपेक्षित असते,असे त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एकआय) प्रणालीचा वापर हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कार्यप्रणाली यशस्वी करण्याचा निर्धार केला.