वन मंत्रालयाचा निर्णय; ‘एफडीसीएम’ला तब्बल २५ कोटींचा फटका
वन विकास महामंडळाचे (एफडीसीएम) मामला व चिचपल्लीतील १२,५०० हेक्टर जंगल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट केल्याने ‘एफडीसीएम’ला चालू आर्थिक वर्षांत तब्बल २५ कोटींचा आर्थिक फटका बसल्याची माहिती एफडीसीएमच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने समोर आली आहे. स्थिती अशीच राहिली, तर भविष्यात एफडीसीएमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.
या जिल्हय़ात वन विकास महामंडळाचे उत्तर व दक्षिण सर्कल मिळून सहा विभाग आहेत. उत्तर सर्कलमध्ये पश्चिम चांदा, मध्य चांदा व ब्रम्हपुरी, तर दक्षिण सर्कलमध्ये बल्लारपूर डेपो विभाग, मार्केडा व प्राणहिता विभागाचा समावेश आहे. या सहा विभागांचे वार्षिक उत्पन्न १५० कोटींच्या घरात आहे. यामध्ये उत्तर चंद्रपूरचे ३६ कोटी, तर उर्वरीत ११४ कोटी दक्षिण सर्कलचे वार्षिक उत्पन्न आहे. उत्तर चंद्रपूर अंतर्गत येणारे व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतचे मामला व चिचपल्लीचे १२५०० हेक्टर जंगल वन्यजीव व निसर्गाने समृध्द आहे. तिथे नियमित वाघ, बिबटे यासह अन्य वन्यजीवांची नोंद घेण्यात आली. त्यामुळे सदर १२५०० हेक्टर जंगल ताडोबा बफर क्षेत्रात समाविष्ट करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी धरला होता. त्यांच्या आग्रहास्तव सदर १२,५०० हेक्टर जंगल ताडोबा बफर क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. त्याचा थेट परिणाम वन विकास महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी एफडीसीएम उत्तर चंद्रपूर सर्कलचे महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षांत २५ कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. २५ कोटीचे आर्थिक उत्पन्न पर्यावरण पर्यटनातून मिळू शकत नाही.
तोटा भरून काढण्याचा प्रश्न
एफडीसीएमच्या उत्तर चंद्रपूर सर्कलचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३६ कोटींच्या घरात आहे. मात्र, यावर्षी ताडोबा बफरला दिलेल्या १२,५०० हेक्टर जंगलामुळे तिथे सागवान व इतर लाकडांची तोड झालीच नाही. त्याचा थेट परिणाम लिलावावर झाला आणि चालू आर्थिक वर्षांत तब्बल २५ कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हा आर्थिक तोटा कसा भरून काढायचा असा प्रश्न एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.