जनतेला विकास हवा आहे. देव-धर्माच्या नावावर राजकारण नको. देव-धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर ‘उपर वाले की लाठी में आवाज नहीं होती’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निर्णायक विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. “काँग्रेसला समाजाच्या सर्व थरातून पाठिंबा मिळाला. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे झाले,” असं अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा >> “दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यावर…”, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“भाजपा डबल इंजिनचा गवगवा करते. पण, कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी देव-धर्माच्या नावावर मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो’ यात्रेतच रचला गेला,” असेही अशोक चव्हाणांनी सांगितलं.