महापालिकेच्या सत्ताकारणात पक्षीय राजकारणाला आम्ही बळ दिले. मात्र आता नीतिमता असणाऱ्या भाजप पक्षाने ताराराणी आघाडीशी केलेली आघाडी दुर्दैवी आहे. कोल्हापूरच्या विकासाबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. एक वर्ष भाजप सत्तेला होऊनही कोल्हापूरला काय मिळाले, याचा शोध घ्यावा लागेल, अशी टीका माजी मंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे केली, याचवेळी महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस कमिटीमध्ये बठक पार पडली, या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण अध्यक्षस्थानी होते.
सतेज पाटील म्हणाले,की महापालिकेच्या गत वेळच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्यशक्ती अशी पक्षीय आघाडी आणून पक्षीय राजकारणास बळ दिले. या वेळी स्वतंत्रपणे जागा लढविण्याचा आमचा मानस आहे. सत्ताकाळात केलेली विकासकामे घेऊन जनांपर्यंत पोहोचविणार आहोत. सत्ताकाळात ११०० कोटींचा निधी आणला. यातून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. थेट पाईप लाईनसाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने निधी मिळाला. पण सध्या विकासकामांसाठी निधी आणण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. केंद्रात भाजप सत्तेत येऊन एक वर्ष झाले. स्मार्टसिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश का झाला नाही? टोल प्रश्नावर अजून तोडगा निघाला नाही. खंडपीठाच्या बाबत शासन दुटप्पी भूमिका घेत आहे, यामुळे याचा निर्णय होत नाही. केंद्राने देशातील १२ तीर्थक्षेत्रांसाठी एक हजार कोटींचा निधी दिला. पण कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळाला नाही.
प्रल्हाद चव्हाण म्हणाले,की गेल्या वेळी बारा जणांना तिकीट नाकारले त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाऊन निवडून आले. या वेळी पक्ष कार्यालयातूनच तिकिट दिले जावे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली आणि जो निवडून येईल तो काँग्रेसचा नगरसेवक म्हणून काम करावे. कोणा नेत्याचा नगरसेवक असता कामा नये. सुरेश कुऱ्हाडे म्हणाले,की महापौर वैशाली डकरे  यांची भाषणे झाली. सरला पाटील यांनी महिलांना पन्नास टक्के जागा द्याव्यात अशी मागणी केली.
काँग्रेसचा अनोखा उपक्रम
महापालिका निवडणुकीसाठी लोकांसमोर जाताना काँग्रेस पक्षाने अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दहा दिवस मोहीम राबविली जाणार आहे. एका दिवशी एक विषय धरून केलेली कामे आणि जनतेला हव्या असणाऱ्या सोयी, अपेक्षा याचा सुसंवाद या अभियानांतर्गत राबवला जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former minister satej patil criticises bjp
First published on: 05-08-2015 at 04:00 IST