कार्यालयाच्या उद्घाटनाला सर्वपक्षीय नेत्यांचा गोतावळा;काँग्रेसच्या विद्यमान खासदारांसह स्थानिकांना निमंत्रण नाही
वसंत मुंडे
बीड : काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ हे घोषवाक्य घेऊन आपली ‘स्वतंत्र चूल’ मांडण्याचा निर्णय घेतला असून येत्या ८ मे रोजीे त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी नवले यांनी काँग्रेसचे नेते आणि मदत -पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जून खोतकर, भाजपचे नेते यांच्यासह स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले आहे. मात्र काँग्रेसच्या विद्यमान खासदार रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांनी वगळले आहे.
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार आणि भाजप शिवसेना युतीच्या काळात चार वर्ष राज्यमंत्री असलेले प्रा. नवले तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याविरुध्द बंड केल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडले. जनशक्ती पक्षाची स्थापना करून विधानसभा निवडणुकीत त्यांनी नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. पुढे नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा प्रा.सुरेश नवले यांनी त्यांना साथ दिली. परिणामी त्यांना विधान परिषदेची बक्षिशी मिळाली. मात्र राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवलेंनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत बीड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला. नवलेंना फारशी संधी मिळाली नाही. प्रा.नवले काही वंर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्तच होते. स्थानिक पातळीवर काँग्रेसची सूत्रे विद्यमान खासदार रजनी पाटील यांच्याकडे असून नवले यांचा सुरुवातीपासूनच त्यांच्याशी राजकीय पातळीवर विरोध राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन प्रा. नवले यांनी काँग्रेसमध्येच राहून आपल्या मित्रमंडळाची स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
थुंकी आंदोलन ते बंड
प्रा.सुरेश नवले हे कबड्डीपटू. सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन मंत्री अशोक पाटील यांच्याविरुध्द थुंकी आंदोलन केले आणि ते चर्चेत आले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुध्द निवडणूक जिंकून दुसऱ्या खेपेला युतीच्या काळात ऊर्जा राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके असतानाही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याविरुध्द बंड पुकारल्याने पुन्हा एकदा ते राज्यभर चर्चेत आले. पण बंड फसल्याने त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former minister suresh navale independent friends congress leaders parties flock inauguration office locals congress mps amy
First published on: 06-05-2022 at 01:28 IST