नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी मुखेडचे माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बेटमोगरेकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असले, तरी बँकेमध्ये ते आमच्या गटाचे असल्याचे भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या निवडीपूर्वीच स्पष्ट केले.

बँकेमध्ये सोमवारी शिवकुमार भोसीकर यांची संचालकपदी निवड झाल्यानंतर सर्वानुमते झालेल्या या निवडीचे श्रेय कोणत्याही राजकीय गटाने घेतले नाही; पण उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या गटाचा कौल बेटमोगरेकर यांच्या बाजूने आधीच दिला होता, तरी भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी बँकेमध्ये बेटमोगरेकर हे आमच्या गटाचे आहेत, याकडे लक्ष वेधत दोन्ही निवडींमध्ये चिखलीकर यांना मोठेपणा किंवा श्रेय मिळू नये, याची दक्षता घेतली.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २०२६ साली पूर्वार्धातच संपत असल्याने बेटमोगरेकर यांना उपाध्यक्ष म्हणून जेमतेम ८ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या संयत प्रयत्नांमुळे बेटमोगरेकरांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. त्यांचे काका माधवराव पाटील यांनी मागील काळात बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते.

बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी सकाळी ११.०० वाजता उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेटमोगरेकर यांनी दोन अर्ज भरले. त्यांच्या एका अर्जावर खा.अशोक चव्हाण समर्थक संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली व ‘बेटमोगरेकर आमचेच’ हे अधोरेखित केले. तत्पूर्वी भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी चव्हाण गटाच्या अन्य संचालकांना बेटमोगरेकरांच्या उमेदवारीबद्दल सुस्पष्ट कल्पना दिली होती.

बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षात असले, तरी बँकेमध्ये ते अशोक चव्हाण गटाचे प्रतिनिधी समजले जातात. बेटमोगरेकर यांच्या निवडीनंतर तशीच वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करणे व इतर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भरलेल्या संचालक मंडळाच्या सभेत बेटमोगरेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. अध्यक्ष खतगावकर यांच्यासह अन्य संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. नंतर बेटमोगरेकर यांनी उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडीपूर्वीच हार व गुलाल !

आ.चिखलीकर यांना बेटमोगरेकर यांच्या निवडीचे श्रेय मिळू नये, याची दक्षता भाजपाने मंगळवारी सकाळीच घेतली. अमरनाथ राजूरकर यांनी खासदार अशोक चव्हाण गटाच्या सहा संचालकांस बेटमोगरेकरांसह एकत्र आणले आणि निवडीपूर्वीच त्यांना पुष्पहार घालून गुलाल लावला. या प्रसंगाचे छायाचित्र नंतर समाजमाध्यमांतून सर्वत्र पसरले.