सोलापूर : एकेकाळचा सोलापूरच्या ‘अंडरवर्ल्डचा डॉन’ मानला गेलेल्या आणि शेजारच्या कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून यापूर्वी सलग तीनवेळा अपक्ष आमदार झालेल्या रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
सतत राजकीय पक्ष बदलणारे आणि कोणत्याही एका पक्षात टिकून न राहणारे रवी पाटील यांनी यापूर्वी २०१२ साली सोलापूर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच सुमारास पुण्यातील एका कुप्रसिद्ध गुंडानेही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे वाद उफाळून येऊन अजित पवार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तथापि, इकडे रवी पाटील यांचा राष्ट्रवादीशी झालेला घरोबा औटघटकेचा ठरला होता. आताही त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात घेतलेला प्रवेश चर्चेचा विषय ठरला. कारण पुण्यात काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली रवी पाटील यांचा मुलगा विराज पाटील ( ३५, रा. राॕयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध पुण्यातील विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच सुमारास रवी पाटील यांनी पुण्यात धाव घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली होती.
हेही वाचा – पडळकर म्हणाले, “ओबीसीच नव्हे तर एससी एसटीच्या आरक्षणावर घाला”
या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे बंधू रतिकांत पाटील हे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) माजी आमदार आहेत. तर २००३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर विधानसभा पोटनिवडणुकीत आव्हान दिलेले आणि नंतर सुशीलकुमारांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनलेले पुतणे उदय रमेश पाटील हे सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत.