नगरःदलालामार्फत बनावट कागदपत्रे तयार करून भारतात घुसखोरी करणाऱ्या चौघा बांगलादेशी नागरिकांना नाशिक व नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने नगर शहराजवळ अटक केली. या चौघांसह त्यांच्या वास्तव्यासाठी बनावट मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, जन्माचे दाखले, बँक पासबूक आदी कागदपत्रे तयार करून देणाऱ्या पश्चिम बंगाल व बांगलादेशातील १० जणांनी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो. मोहीउद्दीन नाझीम शेख (३६), शहाबुद्दीन जहांगीर खान (२७), दिलावरखान सिराजउल्ला खान (२७) व शहापरान जहांगीर खान (२०, सर्व रा. सध्या शिवशक्ती स्टोन क्रशर, खंडाळा, नगर. मुळा रा. बांगलादेश) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांसह त्यांना मदत करणारे बांगलादेशातील दलाल व बनावट कागदपत्रे तयार करून देणारे रासल एजाज शेख, सोहेल, माणिक खान, नोमान, अब्दुल कादर (सर्व रा. बांगलादेश, पूर्ण नाव, पत्ते नाहीत), कोबीर मंडल (उत्तर २४ परगाना, पश्चिम बंगाल, पूर्ण नाव पत्ते नाहीत) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात नाशिक एटीएस पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रताप गिरी यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> “आता आम्ही बाळ राहिलो नाही, तो निर्णय…”, शरद पवारांचा उल्लेख करत प्रफुल्ल पटेलांचं विधान
बनावट कागदपत्रे त्यांनी मुंबई, कल्याण व सुरतमध्ये (गुजरात) तेथील स्थानिक पत्ते देऊन तयार केल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट कागदपत्रेही त्यांनी एजंटमार्फत पैसे देऊन तयार केली.
या चौघांपैकी मो. मोहीउद्दीन शेख याला साधारण १० ते ११ वर्षांपूर्वी त्याच्या ओळखीचा रासल एजाज शेख याने बांगलादेशातून हसनाबादमार्गे पायी पश्चिम बंगाल येथे अवैधमार्गे नेले. तेथून रेल्वेने कल्याण येथे आणले. तेव्हापासून तो भारतात अवैधरित्या राहत आहे. मागील ७ ते ८ वर्षापासून तो खंडाळा (नगर) येथे आहे. शेख याने रासल या दलालाला भारतात प्रवेश करण्यासाठी १० हजार रुपये दिले.
शहाबुद्दीन जहाँगीर खान याला सोहेल (रा. नोहाखेरी, बांगलादेश) याने ६ ते ७ वर्षापूर्वी बांगलादेश येथून आगरतळा येथे अवैधरित्या आणले. तेथून कोलकाता व नंतर कल्याण येथे आणले होते. त्याबदल्यात सोहेल याला १७ हजार रुपये खान याने दिले. तेव्हापासून तो भारतामध्ये राहत आहे. मागील ८ महिन्यापासून तो खंडाळा येथे राहत आहे.
हेही वाचा >>> “आम्ही बसलो, तर सरकार बसेल, आम्ही उठलो, तर…”, बच्चू कडू यांचं विधान
दिलावरखान सिराजउल्ला खान यास माणिक खान (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याने तीन वर्षापुर्वी बांगलादेश येथून आगरतळा व तेथून कल्याण येथे आणले. त्या बदल्यात त्याला १० हजार रुपये दिले. तेंव्हापासून तो अवैधरित्या भारतामध्ये राहत आहे. मागील ३ महिन्यापासून तो खंडाळा येथे राहत आहे.
शहापरान जहाँगीर खान याला नोमान (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याने एक वर्षापूर्वी बांगलादेश येथून अवैधरित्या आगरतळा व तेथून रेल्वेने कल्याण येथे आणले. त्याबदल्यात त्याला खान याने १५ हजार रुपये दिले. तेव्हापासून तो अवैधरित्या भारतामध्ये राहत आहे. मागील सहा महिन्यापासून तो खंडाळा येथे राहत आहे.
नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचीन खैरनार, सपोनी प्रताप गिरी, हवालदार वडकते, तांबोळी, पोना मोरे, पोकॉ प्रदिप गागरे, नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सपोउनि जाकीर शेख, सपोउनि राकेश खेडकर, हवालदार गोरे, संजय हराळे यांनी ही कारवाई केली.