राज्यभर सुरू असलेली वन्यप्राण्यांची पाणवठा प्रगणना आणि वाघ-बिबटांच्या मानवी वस्त्यांवरील आक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर वन खात्याच्या गस्ती-पथकाचा गलथापणा उघडकीस आणणारी घटना वनाच्छादित भंडारा जिह्य़ातील साकोली तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १७ मे रोजी साकोली वनक्षेत्रात उमरी तलावात युरियामिश्रित पाणी प्याल्याने चार हरणांचा तडफडून मृत्यू झाला. उन्हाळ्याची दाहकता अनुभवणाऱ्या विदर्भातील जंगलात वन्यजीवांना पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने पाणवठय़ांवर आलेल्या चार निरपराध हरणांची पाण्यात विष कालवून शिकार करण्यात आल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
विजेच्या तारांचा वापर करून वाघ, नीलगायींच्या शिकारीची प्रकरणे उजेडात आल्यानंतरही जंगलातील गस्ती-पथके सुस्तावल्याने या हरणांना जीव गमवावा लागला.
जंगलातील पाणवठय़ात साचवलेल्या पाण्यात विष कालवून शिकार करण्याची यंदाच्या वर्षी घडलेली ही पहिलीच घटना असून वन विभागाचा पाणवठय़ांवर सक्त देखरेख ठेवली जात असल्याचा दावादेखील उघडा पडला आहे. विषारी पाणी पिऊन मरण पावलेल्या हरणांमध्ये एक नर तर अन्य तीन माद्या असून सर्वाचेच वय अंदाजे दोन वर्षे आहे. भंडारा वन विभागाच्या अखत्यारीतील साकोली वनक्षेत्रात उमरी तलाव भागात ही घटना घडली. नागपूरपासून हे अंतर ११० किमी आहे. दोन वनक्षेत्रांच्या हद्दीत हरणांचे मृतदेह आढळल्यानंतर ही घटना नेमकी कोणाच्या हद्दीत घडली यावरून प्रादेशिक वन विभाग आणि वन विकास महामंडळ यांच्यातही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे वन खात्यातील असमन्वयदेखील चव्हाटय़ावर आला आहे.
ही घटना घडल्यानंतर त्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, बातमी फुटली आणि वन खाते हादरले. साकोली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार हरणांचा मृत्यू कंपार्टमेंट क्रमांक १९४ मध्ये झाला. हे वनक्षेत्र वन विकास महामंडळाच्या हद्दीत येते. परंतु, यात विसंगती अशी की, कंपार्टमेंट क्रमांक ५६७ मध्ये हरणे मृतावस्थेत आढळल्याचेही नंतर सांगण्यात आले आणि हा झुडपी जंगलाचा भाग नियमित वन खात्याच्या हद्दीतील आहे. त्यामुळे वन खाते आणि वन विकास महामंडळ परस्परांवर या घटनेची जबाबदारी ढकलत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या वादात हरणांच्या मृतदेहांचा पंचनामा, शवचिकित्सा आणि अन्य औपचारिकतेला विनाकारण विलंब झाला.
साकोलीचे वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी पी. आर. नंदेश्वर यांनी हरणांचा मृत्यू नेमका कोणत्या हद्दीत झाला याबद्दल वाद असल्याचे मान्य केले आहे. दोन कंपार्टमेंटच्या हद्दीत हरणांचे मृतदेह सापडल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वन विभागाने विलंब केल्यामुळे हरणांच्या शरीराचा बराचसा भाग रानटी कुत्र्यांनी फाडून खाल्ला होता. लिटमस पेपरच्या साह्य़ाने हरणांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हरणांनी युरियामिश्रित पाणी प्यायल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाणवठय़ावर विष कालवून त्यांना मारण्यात आल्याचे दिसत आहे. या घटनेने हादरलेल्या वन विभागाने स्थानिकांची कसून चौकशी सुरू केली असून शिकाऱ्यांना लवकरच पकडू, असा दावा केला आहे. काही मच्छीमार आणि स्थानिक लोकांचे म्हणणे नोंदवूनही त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही.
वन विकास महामंडळाचे भंडाऱ्याचे विभागीय व्यवस्थापक एन. डी. चौधरी यांनी मात्र हरणांच्या मृत्यूवरून वन खात्याशी कोणताही वाद असल्याचे खंडन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही हरणे नियमित वन विभागाच्या हद्दीतील झुडपी जंगलात मृतावस्थेत आढळली. त्यामुळे पंचनाम्यापासून अन्य सर्व प्रक्रिया वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीच पार पाडली.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2013 रोजी प्रकाशित
पाणवठय़ात युरिया मिसळल्याने चार हरणांचा मृत्यू
राज्यभर सुरू असलेली वन्यप्राण्यांची पाणवठा प्रगणना आणि वाघ-बिबटांच्या मानवी वस्त्यांवरील आक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर वन खात्याच्या गस्ती-पथकाचा गलथापणा उघडकीस आणणारी घटना वनाच्छादित भंडारा जिह्य़ातील साकोली तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १७ मे रोजी साकोली वनक्षेत्रात उमरी तलावात युरियामिश्रित पाणी प्याल्याने चार हरणांचा तडफडून मृत्यू झाला.
First published on: 29-05-2013 at 01:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four deer die after drinking urea poisoning water