एकाच कुटुंबातील एका महिलेसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबादच्या तुलळजापूर तालुक्यात सलगरा (दिवटी) या गावात मंगळवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या चौघींनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरीही या चौघींची हत्या झाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे या घटनेमागचे गूढ वाढले आहे. सलगरा (दिवटी) गावात शेतकरी मधुकर देवराव चव्हाण राहतात. त्यांची पत्नी छाया चव्हाण(वय ४०), मोठी मुलगी शीतल चव्हाण (वय १९), पल्लवी चव्हाण (वय १६) आणि अश्विनी चव्हाण (वय १५) या चौघींचे मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळले. मधुकर चव्हाण यांचा १२ वर्षांचा मुलगा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतो आहे.

मधुकर चव्हाण यांच्या तिन्ही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. मोठी मुलगी बी. ए. तृतीय वर्षात, दुसरी बारावीत आणि तिसरी मुलगी अकरावीत होती. एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या चारही महिलांनी आत्महत्या करून आयुष्य संपवल्याची चर्चा गावात सुरू आहे. ही घटना समोर येताच पोलिसांनाही बोलवण्यात आले.

पोलिसांनी हे मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मृतदेहावर साकाळलेले रक्त आणि मारहाणीचे व्रण आढळले आहेत. त्यामुळे या चौघींनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला आहे असा आरोप छाया चव्हाण यांच्या भावाने केला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four female dead bodies found in the well in osmanbad
First published on: 19-09-2017 at 22:56 IST