सोलापूर : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या ढगफुटीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली असून, सोलापुरातील चार तरुण भाविक यात अडकून पडले आहेत. मात्र, ते सर्वजण सुखरूप असून, त्यांनी स्वतः सोलापूरकरांना समाज माध्यमातून ही माहिती दिली आहे.
धीरज ऊर्फ धनराज बगले, समर्थ दसाडे, विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोत्रे हे तरुण भाविक उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये अडकले आहेत. सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेबाबत खात्री करून घेतली असून, सद्यस्थितीत सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. गरज पडल्यास पुढील मदतीसाठी आपण यंत्रणाशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखही भाविकांच्या संपर्कात आहेत.
हे चारही भाविक एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून उत्तरकाशीत गेले होते. त्यांचे शेवटचे ठिकाणा गंगोत्री पार्किंगमध्ये दिसत आहे. कुटुंबीयांशी त्यांचा शेवटचा संपर्क रात्री ११ वाजता होता. तर विठ्ठल पुजारी हा लष्करी तळावर येऊन कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्याने आपण सारेजण सुखरूप असल्याचे स्पष्ट केले आहे.