लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राजस्थान मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या पंढरपूर शाखेत गुंतवणुकीबाबत येथील सेवानिवृत्त शिक्षकासह ३० ठेवीदारांची एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संस्थेच्या संचालकाविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या शाखेच्या व्यवस्थापक, रोखपालास पोलिसांनी अटक केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राजस्थान मल्टिस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेने पंढरपूर येथे शाखा सुरू केली. या नवीन शाखेत गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाच्या योजना जाहीर केल्या, त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी पैसे गुंतवले. यामध्ये देवेंद्र तुकाराम गोंजारी या सेवानिवृत्त शिक्षकाने येथील शाखेत काही रक्कम मुदत ठेवीत गुंतवले. ठेवीची मुदत संपल्यावर गोंजारी यांनी चौकशी केली असता रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांना संशय आला. अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी अनेक ठेवीदारांना अशीच उत्तरे देत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गोंजारी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता अनेक ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. १ कोटी ९६ हजार ७७६ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-सांगलीत नशेसाठीची इंजेक्शन, गोळ्यांचा साठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या वरून चंदुलाल मोहनलाल बियाणी (संस्थापक अध्यक्ष व चेअरमन), बालचंद्र लेढा (उपाध्यक्ष), बद्रीनारायण छगनलाल बाहेती (सचिव), प्रल्हाद दुर्गाप्रसाद अग्रवाल (सह सचिव), विजय विठ्ठलदास लड्डा (कोषाध्यक्ष) व संचालक अशोक जाजू , सतीश सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, अभिषेक चंदुलाल बियाणी, कल्पना बियाणी, व्यंकटेश कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), जगदीश बियाणी (कार्यकारी संचालक), अर्चना मुंदडा (सर व्यवस्थापक), मुदत ठेव अधिकारी विद्याधर वैद्य (सर्व रा. परळी वै, परळी शहर, जि. बीड), स्वप्नील कुलकर्णी (मॅनेजर), अनंता देवकर (दोघे रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्वप्नील कुलकर्णी व अनंता देवकर यांना अटक केली आहे. तरी या पतसंस्थेत कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन तपास अधिकारी श्रीकांत घुगलकर यांनी केले आहे.