धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री तथा शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. शिरपूर येथील दहिवद शिवारात असलेल्या स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यविधी पार पडला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा शिवाजीराव पाटील यांचे जावई राज बब्बर, नातू तथा अभिनेता प्रतिक बब्बर, मुलगी अनिता देशमुख, गिता पाटील, पुतण्या दिलीप पाटील, अनिल पाटील आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.

जेष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव गिरधर पाटील यांचे शनिवारी पहाटे ५ वाजता मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. आज सोमवारी सकाळी ११ वाजता धुळे जिल्ह्यातील शिरपूर या त्यांच्या कर्मभुमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या शिवाजीराव पाटील यांना यावेळी शासकीय मानवंदनाही देण्यात आली. पोलिसांनी हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. तसेच सामुहिक श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर शिरपूर साखर कारखान्याचे शेकडो कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ. अमरिश पटेल यांचे शोक संदेश यावेळी वाचन करण्यात आले. तसेच माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री विजय नवल पाटील, माजी मंत्री माणिकराव गावीत, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार जेष्ठ कवी ना.धो.महानोर, जयवंतराव आवरे, नानासाहेब नायकवाडी हे मान्यवर उपस्थित होते.