कर्जतः तालुक्यातील कोरेगाव येथील एका समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादातून अंत्यविधीस सोमवारी तब्बल दोन ते अडीच तास विलंब झाल्याची घटना घडली. अखेर प्रशासनाने हस्तक्षेप करत, पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.
कोरेगाव येथे एका समाजाची पारंपरिक स्मशानभूमी आहे. सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळ येथे दफनविधी केला जातो. मात्र, स्मशानभूमीलगत असणाऱ्या काही जणांनी स्मशानभूमी ही आमची खासगी जमीन आहे, असा दावा केला. त्यामुळे काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. या समाजाने अनेक वेळा तहसील कार्यालयासमोर स्मशानभूमीसाठी आंदोलनही केले आहे.
समाजातील एकाचे काल, सोमवारी रात्री निधन झाले. त्याचे पार्थिव आज, मंगळवारी सकाळी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. मात्र, काही जणांनी अंत्ययात्रेस स्मशानभूमीत प्रवेश करण्यास विरोध केला. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांना व समाजबांधवांना मनस्ताप सहन करावा लागला. घटनास्थळी तणाव निर्माण झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलत जाधव व तहसीलदार गुरु बिराजदार फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी विरोध करणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली, तर समाजानेही प्रशासनाला स्मशानभूमीचे पुरावे सादर केले. पोलीस निरीक्षक जाधव यांनी कणखर भूमिका घेत विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. तहसीलदार बिराजदार यांनी अंत्यसंस्कार तेथेच होतील, अशी ठाम भूमिका घेतली. सरपंच युवराज शेळके व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समाजाची बाजू घेतली. अखेर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. प्रशासनाच्या भूमिकेमुळे अनुचित प्रकार टळला. स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी समाजाने प्रशासनाकडे केली आहे.