ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून जी.पी.गरड रुजू झाले आहेत. त्यांनी वीरेंद्र तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. वीरेंद्र तिवारी यांची अमरावती येथे बदली झाली असून त्यांच्या जागी गरड यांची पदोन्नतीवर पदस्थापना झाली आहे.
जी.पी.गरड हे १९८४ ला वन विभागात रुजू झाले असून त्यांनी सहायक वनसंरक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्य़ातील आलापल्ली व सिरोंचा वन विभागात काम केले आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगांव बांध येथील राष्ट्रीय उद्यानात गरड यांनी सहायक वनसंरक्षक म्हणून काम केले आहे. १९९६ मध्ये तयार झालेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानाचे पहिले उपवनसंरक्षक म्हणून काम करण्याचा गरड यांना मान मिळाला. प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अमरावती व अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अमरावती जिल्ह्य़ात काम केले आहे. मेळघाटमध्ये केलेल्या चांगल्या कामामुळे ‘मेळघाटचा दीपस्तंभ जी.पी.गरड’ हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयात उपवनसंरक्षक या पदावर काम केल्यानंतर गरड यांनी देहराडून येथे वन्यजीव व रिमोट रिन्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. यासोबतच अप्पर आदिवासी आयुक्त म्हणून २००८ ते १० या काळात अमरावती येथे कार्यरत होते. उपवनसंरक्षक परभणी व नांदेड येथे काम केल्यानंतर त्यांना मुख्य वनसंरक्षक या पदावर बढती मिळाली असून ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे क्षेत्र संचालक पदावर रुजू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G p garad new field director of tadoba tiger reserve project
First published on: 20-02-2014 at 12:01 IST