गडचिरोलीमधील भामरागड तालुका दरवर्षी पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटा नदीवरील पूल व इतर नाले तुडुंब भरून वाहतात, परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत गरोदर मातांची प्रसूतीसाठी ससेहोलपट होते. त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी नेता येत नाही. ही समस्या निकाली काढण्यासाठी आणि येथील गरोदर मातांची ससेहोलपट थांबावी म्हणून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी घेतलेल्या पुढाकारातून भामरागडमध्ये ‘सिझेरियन’ पथक दाखल झाले आहे.
जिल्हाधिकारी मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार, विशेष आरोग्य पथक भामरागडमध्ये दाखल झाले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, बाल रोगतज्ज्ञ व तीन प्रशिक्षित परिचारिका यांचे पथक भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांना आरोग्य सेवा पुरवणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडवली –
सध्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांसाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. येथे ५० गरोदर माता राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर, जवळच असलेल्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहेरघरात असलेल्या गरोदर माताही गरजेनुसार भामरागड येथे दाखल होणार आहेत. प्रसूतीदरम्यान मातेला काही अडचणी निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेची गरज असते. ही व्यवस्था भामरागडमध्ये नाही. या शासकीय सुविधा अहेरी येथे उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मीणा यांनी गरोदर मातांना अहेरी किंवा गडचिरोली येथे आणण्यापेक्षा आपलीच चमू भामरागडला नेता येईल का, याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करून तशा सूचना केल्या. आता दर सात दिवसांनी हे पथक बदलणार असून दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडवली आहे. दुर्गम भागात दरवर्षी पावसाळ्यात माहेरघर किंवा शासकीय दवाखान्यातील निवारा गृहात गरोदर मातांना ठेवले जाते. प्रसूतीवेळी मातांना आवश्यक आरोग्य सेवा देणे, त्यांना योग्य आहार देणे, अशा सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरवल्या जातात. आता गरज भासल्यास भामरागडमध्येच या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पद्धतीने हे पथक तेथे सेवा देणार –
“भामरागड येथे ग्रामीण रुग्णालय आहे, परंतु जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पहिल्यांदाच आम्ही उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे शस्त्रक्रियेच्या सुविधा तेथे पुरवत आहोत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचारिका आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा रक्तसाठा, ‘व्हेंटिलेटर’सह इतर आवश्यक उपकरणे दिली आहेत. रोटेशन पद्धतीने हे पथक तेथे सेवा देणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात आली आहे.” अशी माहिती गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी माहिती दिली.