भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबर चकमकीत शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम यांना, आज सायंकाळी 7 वाजता पोलीस दलाच्यावतीने पोलीस कवायत मैदानावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली.

पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार शहीदांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक विशेष अभियान राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेत मृत पावलेल्या शहीद पोलिसांच्या पार्थीवावर पुष्पचक्र अर्पण केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहिद जवान आत्राम यांचे परिवार उपस्थित होते. पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक यांनी यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले.

तत्पूर्वी  चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत  शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे ते म्हणाले. धनाजी होनमाने यांना नुकतेच नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेत एक जवानही जखमी झाला आहे. जखमी पोलीस जवानावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.