नांदेड : सात दिवसांच्या विश्रांतीनंतर गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला पावसाने रात्रभर हजेरी लावली. सुरुवातीला जोरदार तर नंतर रिमझिम स्वरूपाचा पाऊस सकाळपर्यंत सुरू होता. यामुळे रस्ते चिखलमय झाले तरी बालगोपालांचा उत्साह कमी झाला नव्हता. बेल-फुल, हार-तुरे व सजावटीच्या साहित्यासह विविध आकाराच्या आकर्षक श्री मूर्तींनी बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
मराठी माणसात गणेशोत्सवाचे आगळे महत्त्व आहे. या दरम्यान, गौरींचे सुद्धा आगमन होते. ग्रामीण महाराष्ट्रात महालक्ष्मीच्या सणाला प्रचंड महत्त्व असते. यानिमित्त कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने कोणी कुठेही असले तरी ज्येष्ठा गौरीच्या पूजनासाठी ते आवर्जून गावाकडे येत असतात. दरम्यान, गणेशोत्सव आनंदाने व सौहार्दाने, पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन शासन-प्रशासनाने केले आहे.
दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस जिल्हाभरात झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मुखेड तालुक्यात हसनाळ व परिसरात पावसाने हाहाकार माजवला. जीवित व वित्त हानी झाली. याची दुखरी किनार यंदाच्या गणेशोत्सवाला निश्चित आहे. तरीही दुःख विसरून येणाऱ्या काळाला सामोरे जाण्याची मराठी माणसातील हिम्मत वाखाणण्याजोगी आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींकडे श्री भक्तांचा अधिक कल दिसून येतो. त्याची स्वतंत्र दुकाने प्रत्येक भागात थाटलेली दिसून येतात.
घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आटोपली. त्यानंतर प्रत्येक काॅलनी, गल्लीतील बच्चे कंपनी सार्वजनिक मंडळात जमा झाली. दुपानंतर विविध मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू झाल्या. रिमझिम ते हलक्या पावसात वाजतगाजत, नाचत बाप्पांचे आगमन झाले. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळांच्या श्री मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू होती. इथून पुढे ११ दिवस बाप्पांचा मुक्काम असून प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते ज्येष्ठा गौरीचे. रविवारी आवाहन असून सोमवारी (१ सप्टेंबर) पूजन होणार आहे.
पर्यावरणपूरक विसर्जन तलावाची निर्मिती
गोदावरी नदीची दुरवस्था झाली असून संपूर्ण पात्रात जलपर्णी माजली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. त्यासाठी प्रत्येक चौकात, महाविद्यालयाच्या मैदानात पर्यावरणपूरक विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तर ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.