पारपंरिक थाटात, वाद्यांच्या दणदणाटात आणि जल्लोष व उत्साहात राज्यात शुक्रवारी श्री गणरायाचे आगमन झाले. लाडक्या बाप्पांचे घरोघरी थाटात स्वागत होत असतानाच वैशिष्टय़पूर्ण अशा सार्वजनिक गणेशोत्सवालाही राज्यभरात प्रारंभ झाला. पुढे दहा दिवस चालणाऱ्या या आनंदसोहळ्यामुळे वातावरण गणेशमय झाले असून पुण्यातही शुक्रवारी मानाच्या मंडळांनी देखण्या मिरवणुका काढून मुहूर्तावर गणरायांची प्राणप्रतिष्ठापना केली आणि पुण्याचा वैशिष्टय़पूर्ण उत्सव नेहमीच्याच उत्साहात सुरू झाला.
केंद्रातील सरकारमध्ये झालेला बदल, राज्यात येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका, पावसामुळे राज्यभरातील रस्त्यांची झालेली चाळण, शहरांमधील खड्डे, माळीण सारखी हादरवून सोडणारी घटना, दहशतवाद, ध्वनिवर्धक बंदीचा गेली काही वर्षे सुरू असलेला वाद, या आणि अशा अनेकविध घटनांच्या पाश्र्वभूमीवर राज्यात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत असून या घटनांचे विविधांगी पडसाद सार्वजनिक उत्सवातही पहायला मिळत आहेत. या प्रसंगाना पूरक असे देखावे यंदा उत्सवांमध्ये पहायला मिळणार असून अनेक मंडळांनी या विषयांवर आधारित प्रसंगनाटय़ही बसवली आहेत. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गेले महिनाभर सर्वत्र तयारी सुरू होती आणि शुक्रवारी बाप्पांचे आगमन झाले. घरोघरी आलेल्या या पाहुण्यासाठी पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, प्रसाद आदींच्या खरेदीत गणेशभक्त गर्क होते, तर सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी झाल्यानंतर देखावे आणि सजावटीच्या कामात व्यस्त होते. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने यंदाही लहान- मोठय़ा सर्व शहरांमध्ये सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढून गणरायाला उत्सवस्थानी नेले. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि ढोल-ताशा पथकांचे वादन यामुळे गणेशोत्सवाचा पहिला दिवस रंगला. मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळणही या वेळी केली जात होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोषही या वेळी सुरू होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi celebrations kick off in maharashtra with great intensity of feeling
First published on: 30-08-2014 at 01:20 IST