पंढरपूर : ज्या शहरात टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष होतो अशा पंढरपुरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली. शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. तर घरगुती आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात आहे.
१८ विद्या, ६४ कलांचा अधिपती, विघ्नहर्ता अशा लाडक्या गणरायाचे स्वागत सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात होत आहे. पंढरपूर येथेही गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातील स्टेशन रोड, नाथ चौक, भोसले चौक, अर्बन बँक या ठिकाणी श्रींची मूर्ती घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती. तसेच गणपतीसाठी लागणारे साहित्य, वस्त्रे,विद्युत रोषणाई खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. अनेक जणाने आदल्या दिवशी सायंकाळीच गणेश मूर्ती खरेदी केल्या. आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणत असताना मोरया मोरया.. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जात होता. बाप्पाला घरी आणल्यावर दारापाशी औक्षण करून आणले गेले. तर सकाळपासून घरगुती गणेशाची स्थापना घरोघरी करण्यात आली. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी हे आपल्या लाडक्या बाप्पाला नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक यांना नारळाच्या झाडाच्या फांद्या, रंगबेरंगी माळा यांनी पूर्णपणे सजविण्यात आले होते. तसेच लेझीम, ढोल-ताशा वाजत गाजत गणेशाच्या आगमनाचे स्वागत करताना दिसून आले. तर सायंकाळपर्यंत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केलेली दिसून आली.
५० ठिकाणी एक गाव एक गणपती
पंढरपूर तालुक्यात ५० ठिकाणी एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. तर शहर व तालुक्यात जवळपास ४५० सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गणेश मंडळे विविध उपक्रम राबविणार आहेत. तर शहरात गणेश मंडळांनी चांगले उपक्रम, देखावे, आवाजाची मर्यादा पाळाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. दरम्यान सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापन करण्यात आली. यानिमित्त विविध कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे असले तरी गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली.