सांगली : सांगलीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेश जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष पूजेसह महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. सांगलीच्या गणेश मंदिराची गणेश जयंतीनिमित्त खास सजावट करण्यात आली होती. दिवसभर गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

माघी गणेश जयंतीनिमित्त आज शहरात विविध ठिकाणी विशेष पूजाअर्चा यांचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, मिरज व हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणेश मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सांगलीतील गणेश मंदिरात गणेश भक्त रवी पोतदार यांनी रंगीबेरंगी फुलांची विशेष सजावट केली होती. गणेश जन्मकाळावर कीर्तन झाल्यानंतर गणेश जन्मकाळ साजरा करण्यात आला. या वेळी सांगली संस्थानचे युवराज आदित्य पटवर्धन यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी सांगली गणपती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणेश मंदिरातही पहाटेपासून गणेश दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या ठिकाणीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर मिरजेतील गणेशभक्त माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश मंदिराच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.