सावंतवाडी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वाजतगाजत मिरवणुकीने करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीमध्ये नैसर्गिक कुंडात गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले.
मोती तलावात विसर्जन
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुरुवारी सायंकाळनंतर मोती तलावात,नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू झाले आणि रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते. राजघराण्याचा ऐतिहासिक गणपतीदेखील राजघराण्याच्या उपस्थितीत मोती तलावात विसर्जित करण्यात आला. राजवाडा व राजश्री तिसरे खेमसावंत यांच्या माठ्यातील गणपतीचे विसर्जनही वाजतगाजत मिरवणूक काढून करण्यात आले.
यावेळी खेमसावंत भोसले, सौ. शुभदादेवी भोसले, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर, काका मांजरेकर, पुरोहित शरद सोमण, सिताराम गवस, सचिन कुलकर्णी, अखिलेश कोरगावकर यांच्यासह अनेक गणेशभक्त उपस्थित होते.
ग्रामीण भागातही विसर्जनाचा उत्साह
ग्रामीण भागातही दीड दिवसांच्या गणेशाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. नदी, तलाव आणि पाणवठ्यांच्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन झाले. यावेळी भजन, आरती आणि फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मोठ्या भक्तिभावाने गणपतीला निरोप देण्यात आला. तसेच पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेशभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.