कराड: ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल, केशरी रंग उधळत श्रध्दा, भक्ती अन् मांगल्याचा महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची अमाप उत्साहात सांगता झाली. त्यात अवघी कराडनगरी गणेशमय होताना कृष्णाघाट परिसर गणभक्तांनी फुलून गेला होता. कराडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी १० ते रात्री तीन अशी १७ तास शांततेत चालली. अनेक गणेश मंडळांनी शिस्तीचे पालन केल्याचे सुखद चित्र होते.
गणेशभक्तांनी अनंतचतुर्दशीला ‘लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या’, अशी भावनिक साद घालत ‘श्रीं’च्या मूर्तींचे दिवसभर विसर्जन संपन्न झाले. त्यात १९ हजार घरगुती तर, १९५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
‘गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या…’, ‘गणपती निघाले गावाला.., चैन पडेना आम्हाला…’ असा हजारो गणभक्तांनी जयघोष करत कराड, मलकापूरसह पंचक्रोशीतील ‘श्रीं’च्या मूर्तींचे कृष्णा- कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर व जागोजागी उभारलेल्या कृत्रिम जलकुंडात विसर्जन झाले. मुख्य चावडी चौकातील स्वागत कक्षात श्रीफळ देवून गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. माजीमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह स्थानिक नेते, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळांचे स्वागत करत होते.
कार्वेनाका येथील उदयकला गणेश मंडळाच्या मिरवणुकीपासून विसर्जन सोहळ्यास दिमाखात प्रारंभ झाला. पारंपारिक वाद्यांसह झांज पथक, धनगरी नृत्य, बँड, बँजोच्या तालावर गणभक्त ठेका धरून नाचत होते. अनेक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, देखावे सादर केले. नवभारत गणेश मंडळाने पारंपारिक मिरवणुकीचे सालाबादप्रमाणे दर्शन घडवले. दरम्यान, पोलीस व प्रशासनाने केलेले चोख नियोजन, बंदोबस्त यामुळे कुठेही ना वाहतूक कोंडी, ना खडा तंटा झाला. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
कराड पालिकेने कृत्रिम जलकुंडांसह निर्माल्य कुंडांची सोय केली होती. त्यासही चांगला प्रतिसाद मिळून जलप्रदूषण टाळण्याला हातभार मिळाला. सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील मित्र मंडळातर्फे कृष्णाबाई घाटावरील महाप्रसादाचे यंदा अकरावे वर्ष होते. त्याचा हजारो गणेशभक्तांनी लाभ घेतला. एन्व्हायरो नेचर क्लब, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अग्निशामक दल, सर्पमित्र मंडळ, सावळा मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते, सुजाण गणभक्तांचे प्रशासनास मोलाचे सहकार्य मिळाले.
शहरातील मुख्य मार्गावर नवभारत गणेश मंडळ, कासार गल्लीतील श्री गणेश मंडळ तसेच सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री शिवाजी क्रीडा गणेश मंडळाची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. कासार गल्लीतील कायम स्थानापन्न असलेल्या चांदीचा गणपतीही मिरवणुकीत सहभागी करण्यात आला होता.