महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे सह्याद्री साखर कारखान्यातर्फे आयोजित ‘गर्जा हा महाराष्ट्र’ या कार्यक्रमाने कराडकर रसिकांची मने जिंकली. देशाच्या ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन, त्याचा लोककलेशी असलेला संबंध याचे चित्रण महाराष्ट्राच्या लोककलेतील पोवाडा, गणेश स्तवनापासून देवीची आरती ते लावणीसह इतर पारंपरिक विविध गीतांचे कार्यक्रम पार पडले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातर्फे कारखान्याचे प्रेरणास्थान व भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून प्रतिवर्षी प्रीतिसंगम या त्यांच्या समाधी परिसरामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही येथील प्रीतिसंगमावरील कृष्णाबाई घाटावर ‘गर्जा हा महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती दाजी पवार यांच्या उपस्थितीत रंगमंचाचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले.