सांगली: म्हैसाळ येथे सोमवारी सकाळी गॅसचा स्फोट होउन झालेल्या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
म्हैसाळहून शेडबाळला जाणार्या रस्त्यावर मळीभागात असलेल्या घरात आज सकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये सुर्यकांत वनमोरे (वय ४४), मयुरी वनमोरे (वय ३६) आणि प्रिया वनमोरे (वय १३) हे तिघेजण जखमी झाले आहेत.
श्री. सुर्यवंशी नेहमीप्रमाणे आज सकाळी अंघोळी साठी पाणी गरम करण्यासाठी गॅस चालू करत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराचे पत्रे बाजूला जाउन उडून पडले, तर घराची विटाची एक भिंतही कोसळली. स्फोटात घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
गॅस गळती रात्रीपासून सुरू असल्याचा संशय असून रात्रभर गॅस गळतीने आणि दार बंद असल्याने घरातच इंधन वायू कोंडला असावा. सकाळी गॅस सुरू करताच कोंडलेल्या इंधन वायूचा स्फोट झाला असल्याचा संशय आहे.