छत्रपती संभाजीनगर – लातूर शहरातील नांदेड- सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी एका सीएनजी टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे तासभर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

पोलीस, अग्निशामक दल आणि संबंधित सीएनजी कंपनीचे सुरक्षा अधिकारी आपआपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी खबरदारीच्या दृष्टीने सर्व बंदोबस्त करण्यात आला होता. कंपनीच्या तसेच अग्निशमन दलाकडूनही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

अग्निशमन विभागाकडून परिसरातील रस्त्यांवर पाणी मारून स्वच्छता करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. गरुड चौकापासून नांदेडला जाणाऱ्या हायवेवर अचानक सीएनजी टँकरला गळती सुरू झाल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूने येणारी आणि जाणारे वाहतूक बंद करण्यात आली होती. तासभराने वाहतूक सुरळीत करण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.