Gauri Ganapati Festival सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर, घरोघरी गौरींचे आगमन झाले. ग्रामीण भागासह शहरातही महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले. गणपती आणि गौरीच्या आगमनामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

गौरींचे उत्साहात आगमन

​गणपतीच्या आगमनानंतर सोमवारी गौरींचे घरोघरी आगमन झाले. सातव्या दिवशी गणपतीसोबत गौरींचेही विसर्जन होणार आहे. यंदाही गौरी आगमनावेळी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक घरांमध्ये गौराईला माहेरवाशीण मानून तिचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथेनुसार अनेक कुटुंबांमध्ये महालक्ष्मी अर्थात गौराई बसवल्या जातात. काही ठिकाणी नवसाने, तर काही ठिकाणी हौस म्हणून गौरी बसवल्या जातात.

पारंपरिक पूजा

​गौरींना आणण्यासाठी विहिरी किंवा नदीकिनारी जाऊन विशिष्ट वनस्पतींची विधिवत पूजा केली जाते आणि त्या वनस्पती घरी आणून त्यांची गौरींच्या रूपात स्थापना केली जाते. ग्रामीण भागात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथील म्हापसेकर यांच्या निवासस्थानीही गौरींचे आगमन झाले.

रक्तवर्णी गणेशाची पूजा

​सावंतवाडीमध्ये राजघराण्याशी संबंधित काही घराण्यांमध्ये रक्तवर्णी गणेशाच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा आहे. या घराण्यांपैकी एक असलेल्या वैश्यवाडा भागातील म्हापसेकर कुटुंबानेही दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तवर्णी श्री गणेशाची पूजा केली. तीन दिवसांसाठी आलेल्या गौराईचेही आगमन झाले असून, त्यांची मनमोहक मूर्ती आकर्षक पद्धतीने सजवली आहे.