पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गेल्या बुधवारी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी मित्रांसह फिरायला आलेल्या गौतम गायकवाड हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्या बेपत्ता तरुणाचा सातत्याने शोध घेतला जात होता. अखेर किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असेल्या गौतम गायकवाडचा शोध लागला असून पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्याला शोधलं आहे, आता या तरुणाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

गौतम गायकवाड हा तरुण साताऱ्यातील फलटणचा आहे. सध्या तो हैदराबादमध्ये वास्तव्य करतो आणि तिथे एक कॅफे चालवतो. २० ऑगस्टला गौतम आणि त्याचे मित्र सिंहगडावर फिरायला आले होते. सिंहगडावरील तानाजी कडा या ठिकाणी आल्यानंतर गौतम म्हणाला की त्याला लघुशंकेला जायचं आहे. त्यानंतर तो गेला तो परतलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्याला बरंच शोधलं, हाकाही मारल्या पण त्याचा प्रतिसाद आला नाही किंवा तो सापडला नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार देण्यात आली होती. गौतम गायकवाड याचे काही आर्थिक व्यवहार होते अशीही माहिती समजते आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गिर्यारोहकांनीही गौतमचा शोध सुरु केला पण सिंहगड भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने मागचे चार दिवस त्याचा शोध लागत नव्हता, जो आता लागला आहे. तसंच आता गौतम गायकवाडने याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे गौतम गायकवाडने?

आता मी ठीक आहे. मी सिंहगडावर फिरायला आलो होतो. आम्ही फिरत होतो. त्यावेळी मला लघुशंका आली म्हणून मी गेलो. तिथे एक कुत्रा अगदीच जवळ होता, तो घसरत होता म्हणून त्याला वाचवायला गेलो आणि माझाही पाय घसरला. कुत्र्याचं काय झालं ते माहीत नाही, पण मी खाली घसरलो आणि मला चढता येईना. मी आरडाओरडा केला पण कुणालाही माझा आवाज गेला नाही. माझ्यापासून मित्र लांब होते. तिथे थोडं गवत होतं त्याचा मी आधार घेतला. पण मला वरती चढता येत नव्हतं मी खाली घसरु लागला. मग अंधार झाला होता. तरीही मी वर जायचा प्रयत्न केला. मला भीती वाटली. जसा रस्ता दिसत होता किंवा रस्ता मिळत गेला तसा मी जात होतो. थोडं पुढे गेल्यावर खूप पाऊस आला. मला कुणाचा आवाजही आला नाही. मग मी कुणाला दिसेन ही आशा मी सोडून दिली. मी गवतावरच बसलो, मी बेशुद्ध पडत होतो. असं गौतम गायकवाडने सांगितलं आहे. गौतमने एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्याने ही माहिती दिली.

चार दिवस गौतम गायकवाड कुठे होता?

पहिल्या दिवशी संध्याकाळी मी खाली घसरलो. मला झोप लागली खाली आणि वर चढून, मला दमायला झालं होतं. माझ्या केसांमध्ये किडे आणि पाखरं शिरली. माझ्याकडे पाऊच होतं त्यात माझं ब्लेड होतं. त्याने मी जमेल तसे केस कापले. दाढीही काढली. मला कुणाचा आवाज आला नाही. काही ऐकूही येत नव्हतं. मला जशी जाग येत होती तसं मी वरती जायचा प्रयत्न करत होतं. तिरपं जाता येत होतं. गवत जास्त होतं तिथे मी धरुन धरुन वरती गेलो. पण मला त्यामुळे सारखं थकल्यासारखं वाटत होतं. मी चार दिवस उपाशी होतो, पाणीही प्यायला मिळालं नाही. पाऊसच पडत होता. त्या पावसात मी भिजत होतो. मी पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा अंधारच होता. मी जसं जमेल तसं मी चालत होतो. पण भुकेने ताकदही अंगात नव्हती आणि माझं डोकंही चालत नव्हतं. मी गवताच्या मदतीने वरती कसाबसा येत गेलो. ज्या ठिकाणी जास्त गवत आणि झाडं होती तिथून मी येत होतो. रविवारी पाऊस कमी होता. मला माणसं दिसली पण लोक लांब होते. मोठी झाडं होती त्यांचा आधार घेऊन मी आलो. एक लाकूड होतं तिथे बसलो. त्यावेळी दोघं मला शोधत आले. असंही गौतम गायकवाडने सांगितलं.