घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं असून लवकरच मुंबई आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत १३ मे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. हे होर्डिंग ज्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावले होते, भावेश भिंडे हा त्या कंपनीचा संचालक असल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद?

ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो घरी आढळून आला नाही. ज्यावेळी पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन शोधले, त्यावेळी त्यांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नव्हते.

दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सायंकाळी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली आहे. लवकर त्यांना मुंबईत आणण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावेश भिंडे विरोधात आतापर्यंत २३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हादेखील दाखल आहे. याचवर्षी २४ जानेवारी रोजी मुंलुंड पोलीस ठाण्यात भिंडेविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. अवैधरित्या फलक लावल्यामुळे त्याला आतापर्यंत मुंबई मनपाने २१ वेळा दंड ठोठावला आहे. तसेच धनादेश बाऊन्स केल्याप्रकरणी दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.