सांगली : करगणी (ता. आटपाडी) येथील दहावीत शिकणाऱ्या पीडितीने गावातील चौघा तरुणांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून पीडितीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी रात्री दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एकाला संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी करगणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
सोमवारी सकाळी करगणीमध्ये एका शाळकरी मुलीने गावातील चौघा तरुणांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गावबंद ठेवण्यात आला होता. संतप्त जमावाने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी वस्तुस्थितीची पाहणी करत कठोर कारवाईची मागणी केली. तसेच पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महिला अधिकारी नियुक्त करण्याची आग्रही मागणी केली.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गावातील बेकरी व्यवसाय करणारा राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (सर्व रा. करगणी) व अनिल नाना काळे (रा. बनपुरी) या चौघांनी मुलीचे छायाचित्रण केले. त्याच्या आधारे शाळेस जाता येता मानसिक छळ केला. या तक्रारीनुसार संशयिताविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित गेंड यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरा संशयित गायकवाड याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी करगणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता.