लोकसत्ता वार्ताहर

कराड : ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’ नावाने संपन्न झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या डोंगरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, या यशस्वी उपक्रमात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगत या महोत्सवाचे संकल्पक, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केले.

दौलतनगर (ता. पाटण) येथील कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा समारोप आणि मराठी दिग्गज कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार नरेंद्र पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २५ चॅनेलच्या ॲपचे अनावरण आणि उद्घाटनही या वेळी करण्यात आले.

शंभूराज म्हणाले, सलग तीन दिवस रात्री उशिरापर्यंत महोत्सव सुरू असूनही लोकांमधील उत्साह कायम असल्याने पर्यटकांच्या खास आग्रहास्तव महोत्सवातील नौकाविहार (बोटिंग) आणखी तीन दिवस सुरू राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्य जनतेला पर्यटनाच्या ज्या महागड्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळत नाहीत, त्या बाबी कोयना दौलत महोत्सवातून मिळाव्यात अशी संकल्पना होती. म्हणूनच राज्यातील मोठमोठ्या पर्यटनस्थळी असणाऱ्या पॅराग्लायडिंग, नौका विहार (बोटिंग), इलेक्ट्रिक बग्गीची सफर, आनंद मेळाव्यासारख्या सुविधा राज्य पर्यटन विभागामार्फत पुरविण्यात आल्या. तसेच कोयना नदी बारमाही वाहणारी असल्यामुळे येथील जनतेच्या जलपर्यटनाला वाव मिळावा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणूनच हा महोत्सव आयोजिल्याचे शंभूराजेंनी सांगितले.

सांस्कृतिक रंगमंचाला डोंगरी साज

महाराष्ट्रातील दिग्गज मराठी कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कोयना दौलत डोंगरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रंगमंचावर प्रत्यक्ष ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच पवनचक्की, ऊस, केळी, बैलगाडीची चाके, गवताचे छप्पर यांच्या प्रतिकृती करून रंगमंचाला डोंगरी ग्रामीण साज चढविण्यात आला होता.